पुरवणी मागण्यांमध्ये ३ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी
लातूर प्रतिनिधी (बालाजी पडोळे/ शिवाजी श्रीमंगले) – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अथक प्रयत्नामुळे लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक असलेल्या ३ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सुटून रुग्णालय उभारणीचा कामाला गती येणार आहे.
सन २०१३ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. १०० खाटांचे हे रुग्णालय उभारण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून ३१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी ही प्राप्त झाला आहे. परंतु मुख्य अडचण होती ती रुग्णालयाच्या जागेची. यासाठी कृषी महाविद्यालयाची १० एकर जागा निश्चित करण्यात आली होती. या जागेच्या अधिग्रहणासाठी ३ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीची गरज होती. यासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्यांच्या या पाठपुराव्यास यश येऊन पुरवणी मागण्यांमध्ये लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता लवकरच लातूरचे जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णाच्या सेवेत दाखल होईल यात शंका नाही. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नामुळे गेली अनेक वर्ष रखडलेले हे काम आता मार्गी लागले आहे.